हिंदुस्थानी महिलांचे विजयारंभ, नववर्षातील पहिल्याच सामन्यात आयर्लंडचा उडवला धुव्वा

नव्या वर्षातील पहिल्या एकदिवसीय मालिकेत हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने आयर्लंडचा धुव्वा उडवत दणक्यात सुरुवात केली आहे. प्रतिका रावल (89) आणि तेजल हसबनीस (53) यांच्या दमदार खेळाच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने आयर्लंडचे 239 धावांचे लक्ष्य अवघ्या 34.3 षटकांत 4 फलंदाजाच्या मोबदल्यात सहजगत्या पार पाडत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरा सामना रविवारी खेळला जाणार आहे.

राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडची कर्णधार गॅबी लुईस आणि ली पॉल या दोघींच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आयर्लंडने 50 षटकांत  7 बाद 238 धावांपर्यंत मजल मारली. लुईस हिने 129 चेंडूंत 15 चौकारांच्या मदतीने 92 धावा केल्या, तर ली पॉलने 73 चेंडूत 7 चौकारांसह 59 धावांची खेळी केली. हिंदुस्थानच्या प्रिया मिश्राने 2 गडी बाद केले, तर तितास साधू, सायली सातघरे आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.  239 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानच्या प्रतिका रावल आणि तेजल हसबनीस या दोघी विजयाच्या शिल्पकार ठरल्या. प्रतिकाने 96 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकारासह 89 धावा चोपल्या, तर हसबनीसने 46 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या.