पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या टी20 सामन्यात दमदार पुनरागमन केले आहे. सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने तोडफोड फलंदाजी करत 46 चेंडूंमध्ये शतक ठोकले. टीम इंडियाच्या तुफान फलंदाजीमुळे झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 235 धावांच्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे.
हिंदुस्थान आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना हरारेमध्ये खेळवण्यात येत आहे. कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सलामीला आलेला शुभमन गिल अवघ्या दोन या धावसंख्येवर स्वस्तात माघारी परतला. परंतु अभिषेक शर्माने एका बाजूने मोर्चा सांभाळत झिम्बाब्वेच्या गोलदाजांचा चांगलाचा समाचार घेतला. अभिषेकने 46 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 100 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर आलेल्या ऋतुराज गायकवाड (77 धावा) आणि रिंकु सिंग (48 धावा) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियाने झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 235 धावांचे आव्हान दिले आहे.