IND Vs ZIM : गोलंदाजांचा भेदक मारा, डायन मायर्सची एकाकी झुंज; टीम इंडियाचा 23 धावांनी विजय

पहिला टी-20 सामना वगळता शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने आपला दमदार खेळ कायम ठेवतं तिसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव केला आहे. 183 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून डायन मायर्सने (नाबाद 65 धावा) एकाकी झूंज दिली, मात्र तो अपयशी ठरला

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तीसरा सामना टीम इंडियाने जिंकत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. शुभमन गिलने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला शुभमन गिलच्या सोबतीला अभिषेक शर्माच्या ऐवजी यशस्वी जयसवाला संधी देण्यात आली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्वस्तात माघारी परतणाऱ्या कर्णधार शुभमन गिलने या सामन्यात दमदार फलंदाजी करत 49 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 66 धावा केल्या. यशस्वी (36 धावा) आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. दुसऱ्या सामन्यात 46 चेंडूंमध्ये शतक ठोकणारा अभिषेक शर्मा (10) मात्र या सामन्यात स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर ऋतुराज (49 धावा), सॅमसन (12 धावा) आणि रिंकू सिंग (1 धाव) यांनी नाबाद खेळत झिम्बाब्वेला 183 धावांचे आव्हान दिले होते.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलदाजांनी चांगलेच जकडून ठेवले. झिम्बाब्वेचा अर्धा संघ 39 या धावसंख्येवर तंबुत परतला होता. मात्र डायन मायर्सने (नाबाद 65 धावा) एका बाजूने खिंड लढवत संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. कर्णधार सिकंदर रझा (15 धावा), क्लाइव्ह मदंडे (37 धावा) आणि मसागदझा (नाबाद 18 धावा) यांनी संघाच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना 159 या धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर आवेश खान दोन आणि खलील अहमदने एक विकेट घेतली.