आपल्याला सर्व सामने खेळणारा कर्णधार हवा होता. सूर्यकुमार यादव हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. हार्दिक पंडय़ाचा फिटनेस त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळेच पंडय़ाऐवजी सूर्यकुमारला टीम इंडियाच्या टी-20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले, असे ‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले.
श्रीलंका दौऱयावर रवाना होण्यापूर्वी हिंदुस्थानी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अजित आगरकर यांनी कर्णधारपदाबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, ‘अष्टपैलू हार्दिक पंडय़ा हा टीम इंडियातील खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, पण त्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय आहे. त्याला प्रत्येक सामना खेळायला लावणे निवडकर्त्यांना आणि प्रशिक्षकांना अवघड जाते. आम्हाला सर्व सामने खेळण्यासाठी उपलब्ध असलेला कर्णधार हवा होता. सूर्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत, त्यामुळे टीम इंडियाची धुरा त्याच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला, असे आगरकरने सांगितले.
रोहित–विराट 2027च्या वर्ल्ड कपपर्यंत खेळू शकतात ः गंभीर
गौतम गंभीर म्हणाले, ‘रोहित शर्मा व विराट कोहली यांनी मोठय़ा व्यासपीठावर आपण काय करू शकतो हे दाखवून दिले आहे. मग तो टी-20 वर्ल्ड कप असो किंवा वन डे वर्ल्ड कप. या दोन्ही दिग्गज खेळाडूंमधील अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आहे. फिटनेसने दगा दिला नाही, तर रोहित-विराट चांगला असेल तर 2027 चा वर्ल्ड कपही खेळू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.