यजमान श्रीलंकेने 240 या असुरक्षित धावसंख्येचा यशस्वी बचाव करताना हिंदुस्थानवर दुसऱ्या वन डे क्रिकेट सामन्यात 32 धावा आणि 47 चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला. श्रीलंकेच्या जेफ्री वॅण्डर्सेने अर्धा डझन फलंदाज बाद करीत हिंदुस्थान अफलातून गोलंदाजी केली. तोच या विजयाचा शिल्पकार ठरला. याचबरोबर श्रीलंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
श्रीलंकेकडून मिळालेल्या 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा डाव 42.2 षटकांत 208 धावसंख्येवरच गारद झाला. कर्णधार रोहित शर्मा (64) व शुबमन गिल (35) यांनी 13.3 षटकांत 97 धावांची सलामी देत हिंदुस्थानला खणखणीत सुरुवात करून दिली होती. रोहितने 44 चेंडूंत 64 धावा व गिलने 44 चेंडूंत 35 धावा केल्या. मात्र त्यानंतर श्रीलंकेच्या जेफ्री वॅण्डर्सेच्या फिरकीने सलामीच्या जोडीसह विराट कोहली (14), शिवम दुबे (0), श्रेयस अय्यर (7) व के. एल. राहुल (0) यांना बाद करीत हिंदुस्थानच्या फलंदाजीतील हवाच काढून घेतली. चरिथ अस्लंकानेही तीन फलंदाज बाद करीत हिंदुस्थानचा डाव संपविण्यात मोलाची भूमिका बजावली.