IND vs SL : सूर्या-रिंकूने गोलंदाजीत हात आजमावला; ‘सुपर ओव्हर’मध्ये हिंदुस्थानने कडक विजय मिळवत लंकेला ‘व्हाईटवॉश’ दिला

पार्ट टाईम फिरकीपटू रिंकू सिंह आणि सूर्यकुमार यादवने अखेरच्या दोन षटकांमध्ये प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आणि सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये वाशिंग्टन सुंदरने फक्त दोन धावा दिल्या. तीन धावांचे आव्हान पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत हिंदुस्थानने पूर्ण केले आणि श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला.

एकवेळ श्रीलंका सामना सहज खिशात घालेल अशी परिस्थिती होती. श्रीलंकेला 30 चेंडूत 30 धावा हव्या होत्या. पण 15व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोईने कुसाल मेंडीसला (43 धावा) बाद केल्या. 16व्या षटकातपर्यंत श्रीलंकेची धावसंख्या 2 बाद 115 होती. लंका सामना जिंकणार असे वाटत असतानाच वाशिंग्टन सुंदरने हसरंगा आणि असलंकाला एकामागोमाग बाद करून सामन्यात ट्विस्ट आणला.

अखेरच्या दोन षटकांमध्ये श्रीलंकेला 9 धावा हव्या होत्या आणि हातात 6 विकेट्स होत्या. सूर्यकुमारने चेंडू रिंकूच्या हातात सोपवला. त्यानेही दुसऱ्याच चेंडूवर सेट झालेल्या कुसाल परेरा (46 धावा) याला बाद केले. त्यानंतर षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रमेश मेंडीस याला शुभमन गिलकरवी झेलबाद केल्याने लंकेची अवस्था 6 बाद 132 झाली.

त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वत: निर्णायक षटक टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करत त्याने दुसऱ्या चेंडूवर कमिंडू मेंडीसला बाद केले. त्यावेळी श्रीलंकेला 4 चेंडूत 6 धावांची आवश्यकता होती. पुढच्या चेंडूवर सूर्याने तिक्षणाचा बळी घेतला. चौथ्या चेंडूवर 1 धाव गेली. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर प्रत्येकी दोन धावा काढत लंकेने सामना टाय केला.

सुपर ओव्हरमध्ये सूर्याने चेंडू वाशिंग्टन सुंदरकडे सोपवला. लंकेकडून निसंका आणि परेरा फलंदाजीला उतरले. सुपर ओव्हरचा पहिला चेंडू वाईड गेला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर 1 धाव गेली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर परेरा आणि तिसऱ्या चेंडूवर निसंकाला बाद करत सुंदरने लंकेची हवाच काढून घेतली. त्यानंतर सूर्याने चौकार ठोकत हिंदुस्थानला आरामात विजय मिळवून दिला. वाशिंग्टन सुंदरला सामनावीर, तर सूर्यकुमार यादवला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.