IND Vs SL 2024 : रोहित शर्माचं कमबॅक होणार? गंभीरच्या ‘या’ खास खेळाडूलाही संधी?

जुलै महिन्याच्या अखेरीस टीम इंडियाचा श्रीलंका दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. या दौऱ्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली असून रोहित शर्मा चाहत्यांना एकदिवसीय मालिकेमध्ये खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मासोबत केकेआरच्या मुंबईकर खेळाडूची सुद्धा निवड होण्याची शक्यता आहे.

क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरची राष्ट्रीय निवडसमीतीसोबत बैठक झाली. BCCI च्या माध्यामातून आयोजीत करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये संघ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, निवड समिती सदस्य, गौतम गंभीर आणि BCCI सचिव जय शहा यांचा समावेश होता. तासभर झालेल्या मिटींगमध्ये गौतम गंभीरने काही महत्वाचे मुद्दे मांडले. तीन्ही फॉरमेट खेळण्यास उपस्थित असणाऱ्या खेळाडूंसाठी गंभीर आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा उपस्थित असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर रोहित शर्मा या मालिकेसाठी उपस्थित असेल, तर कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असणार आहे. रोहित शर्मा सध्या अमेरिकेमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यामुळे जर तो एकदिवसीय मालिकेसाठी उपस्थित झाला नाही, तर मात्र कर्णधार म्हणून के एल राहूलची निवड होऊ शकते. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आणि टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरची सुद्धा या वनडे मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता आहे.