ऐतिहासिक अन् संस्मरणीय. अवघ्या 642 चेंडूंत हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना संपला आणि तो कसोटी इतिहासातील निकाल लागलेला सर्वात छोटा कसोटी सामना ठरला. बुधवारी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांत गुंडाळल्यानंतर हिंदुस्थानने यजमान दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 176 धावांत संपवला आणि 79 धावांचे विजयी लक्ष्य 12 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविण्यात हिंदुस्थानने यश मिळवले. हा कसोटी सामना अवघ्या दीड दिवसापेक्षा कमी काळात संपल्यामुळे कसोटी क्रिकेटबद्दल चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या दीड दिवसात झालेल्या 107 षटकांत (642 चेंडू) 33 विकेट्सच्या मोबदल्यात दोन्ही संघ फक्त 524 धावाच करू शकले.
बुधवारी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांत आटोपल्यावरच हा सामना विक्रमी वेळेत संपण्याचे संकेत मिळाले होते आणि तसेच झाले. बुधवारच्या 3 बाद 80 या धावसंख्येनंतर दक्षिण आफ्रिकेने त्यात आणखी 96 धावांची भर घातली आणि पाहुण्यांपुढे 79 धावांचे आव्हान ठेवले, हिंदुस्थानने ते आव्हान फार वेळ न दवडता 12 षटकांत पार करत कसोटी इतिहासातील सर्वात छोटय़ा कसोटी सामन्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळवले. पहिल्या डावात मोहम्मद सिराजचे वादळ घोंघावले होते, तर दुसऱया डावात बुमराने 61 धावांत 6 विकेट घेत आपल्याही चेंडूंची दहशत आफ्रिकन फलंदाजांना दाखवली. बुमराने कसोटीत 86 धावांत 8 विकेट टिपले, तर 46 धावांत 7 विकेट घेणारा सिराज ‘सामनावीर’ ठरला. त्याच्या भेदकतेमुळेच आफ्रिकन डाव 55 धावांत आटोपला होता.
हिंदुस्थानचा न्यूलॅण्ड्सवर पहिलाच विजय
हिंदुस्थानने तब्बल दोन दशकांनंतर दक्षिण आफ्रिकेत मालिका बरोबरीत सोडविण्यात यश मिळवताना केपटाऊनच्या न्यूलॅण्ड्सवर पहिलावहिला विजय नोंदवला. हिंदुस्थानचा आफ्रिकन भूमीवरील हा पाचवाच विजय आहे. तसेच गेल्या 31 वर्षांत हिंदुस्थान दक्षिण आफ्रिकेत दहा मालिका खेळला असून त्यापैकी 8 मालिका पराभूत झाला आहे, तर दोन मालिका बरोबरीत सोडविण्यात यश मिळवले आहे. हिंदुस्थानला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकन भूमीवर एकही मालिका विजय अद्याप मिळवता आलेला नाही.
सर्वात छोटा कसोटी सामना
हिंदुस्थानने अवघ्या 642 चेंडूंत केपटाऊन कसोटी सामना आपल्या खिशात घातला. अवघ्या दीड दिवसात हा सामना संपला असला तरी त्याने कमी चेंडूंत सामना संपण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. कसोटी इतिहासात 1932 साली ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 656 चेंडूंत संपला होता. तसेच कसोटी इतिहासात आतापर्यंत 28 सामने दोन दिवसांत संपले असून हिंदुस्थानने तिसऱयांदा दोन दिवसांत कसोटी विजय मिळवला आहे. याआधी 2018 मध्ये बंगळुरू कसोटीत अफगाणिस्तान तर 2021 ला अहमदाबाद कसोटीत इंग्लंडचा दुसऱयाच दिवशी खेळ खल्लास केला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने सर्वाधिक नऊ कसोटी विजय दोन दिवसांत मिळवले आहेत, तर इंग्लंड तब्बल आठ कसोटीत दोन दिवसांत हरला आहे. हिंदुस्थानने अद्याप एकही कसोटी सामना दोन दिवसांत गमावलेला नाही.
मार्करमचे विक्रमी शतक
बुधवारच्या 3 बाद 62 वरून पुढे खेळ सुरू करणाऱया दक्षिण आफ्रिकन डावाला एडन मार्करमने एकहाती सावरले. त्याला कुणाचीच साथ लाभली नाही. तोच एकटा लढला आणि खेळला. 7 बाद 111 अशा स्थितीत असलेल्या संघाला मार्करमच्या फटकेबाजीने दीडशेपार नेले. त्याने कॅगिसो रबाडाबरोबर 51 धावांची भागी रचली. यात रबाडाचा वाटा फक्त 2 धावांचा. मार्करमने 103 चेंडूंत 106 धावा फटकावताना 17 चौकार आणि 2 षटकार ठोकले. मार्करमनंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 176 धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेच्या 176 धावांत 106 धावा काढणाऱया मार्करमचा वाटा 60 टक्क्यांपेक्षा जास्त होता. संघाच्या कमी धावसंख्येत शतक ठोकणाऱया फलंदाजांच्या पंक्तीत मार्करमने आपलेही स्थान कायम केले. 61 धावांत 6 विकेट टिपणाऱया बुमराने कारकीर्दीत नवव्यांदा पाच विकेट टिपले. त्याने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 12 विकेट घेत डीन एल्गरसह ‘मालिकावीर’ पुरस्काराचा बहुमान मिळवला.