संजूच्या शतकाचा आफ्रिकेला तडाखा

संजू सॅमसनच्या घणाघाती शतकाचा जबर तडाखा यजमान दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच टी-20 सामन्यात बसला. हिंदुस्थानच्या 203 धावांचा पाठलाग करताना यजमानांची 141 धावांतच दमछाक झाली आणि हिंदुस्थानने 61 धावांनी विजयी सलामी देत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

हिंदुस्थानच्या डावात एकटया संजू सॅमसनचा धमाका पाहायला मिळाला, तसाच धमाका दक्षिण आफ्रिकन डावात कुणाचाही दिसला नाही. आघाडीच्या फलंदाजांना वरुण चक्रवर्तीने तर मधल्या फळीला रवि बिश्नोईने स्वस्तात बाद केले. हेन्रिक क्लासनकडून षटकारांची आतषबाजी अपेक्षित होती, पण तो 25 धावांवर बाद झाला आणि तेथेच आफ्रिकेने लढत गमावली. मग शेवटच्या क्षणी मार्को यान्सन आणि जिराल्ड कोत्झीने उत्तुंग षटकार खेचत केवळ संघाची धावसंख्या 141 पर्यंत वाढवली. वरुण आणि रवीने प्रत्येकी तीन विकेट टिपले.

संजूचे डर्बनमध्ये वादळ

संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीवर रॉकेट हल्ला गेला. त्याने 27 चेंडूंत पन्नाशी तर 47 चेंडूवर शतक ठोकण्याचा पराक्रम केला. संजू झंझावात इतका भन्नाट होता की त्याने चक्क दहावेळा  चेंडू स्टेडियममध्ये भिरकावला. संजू वगळता हिंदुस्थानी डावाला कुणाचीही साथ लाभली नाही. तरीही संजूने सूर्यकुमार यादवसह (21) दुसर्या विकेटसाठी 76 तर तिलक वर्माबरोबर (33) तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची दणकेबाज भागी रचली.

संजूच्या फटकेबाजीमुळे हिंदुस्थानने पाच षटकांत 49 तर पुढील दहा षटकांत 118 धावा चोपून काढल्या. पण 16 व्या षटकांत शतकानंतर संजूचा झंझावात थांबला आणि हिंदुस्थानच्या धावांचा वेगही मंदावला. हिंदुस्थानने शेवटच्या पाच षटकांत पाच विकेट गमावत केवळ 35 धावा केल्या. अन्यथा हिंदुस्थानच्या फलकावर 230 पेक्षा अधिक धावा दिसल्या असत्या.

संजू हिंदुस्थानचा पहिलाच सलग शतकवीर

बांगलादेशविरुद्ध 111 धावांची खेळी करणाऱया संजूने सलग दुसरे शतक ठोकताना 107 धावा ठोकल्या. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सलग शतके ठोकणारा संजू पहिलाच हिंदुस्थानी फलंदाज असला तरी फ्रान्सचा गुस्ताव मॅकियॉन, दक्षिण आफ्रिकेचा रिली रोसॉ आणि इंग्लंडच्या फिल सॉल्ट यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सलग शतके साजरी केली आहेत.