IND vs NZ Test – टीम इंडियाचा फुसका बार; न्यूझीलंडनं केला ‘व्हाईटवॉश’चा धमाका; 2000 नंतर पहिल्यांदाच असं घडलं

 

वानखेडेवर झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी लढतीतही टीम इंडियाचे खेळाडू फिरकी चक्रात अडकले आणि रोहित सेनेला पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 147 धावांचे आव्हान हिंदुस्थानचा संघ पेलू शकला नाही. हिंदुस्थानचा संघ 121 धावांमध्ये बाद झाला. जवळपास अडीच दिवसांचा खेळ बाकी असताना हा कसोटी सामना संपला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने हिंदुस्थानला वाईट वॉश दिला. घरच्या मैदानावर 2000 नंतर पहिल्यांदाच हिंदुस्तानला वाईटवॉश स्वीकारावा लागला, तर तीन सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानच्या संघाला पहिल्यांदाच मायदेशात क्लीन स्वीप मिळाली.

माफक आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानला तिसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. या मालिकेत लौकिकास साजेशी कामगिरी करू न शकलेला रोहित शर्मा 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली, सर्फराज खान, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल अशी रांग लागल्याने हिंदुस्थानचा डाव पाच बाद 29 असा संकटात सापडला. यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी अर्धशतकीय भागीदारी करत हिंदुस्थानच्या विजयाच्या अशा पल्लवीत केल्या. यादरम्यान ऋषभ पंतने अर्धशतक ठोकले.


दुसऱ्या बाजूने रवींद्र जडेजा बाद झाला आणि त्या पाठोपाठ पण तरी माघारी परतला. त्यामुळे हिंदुस्थानचा पराभव दृष्टीपथात दिसू लागला. वॉशिंग्टन सुंदरने एक बाजू लावून धरल्याने आणि काही काळ आर अश्विनने त्याला साथ दिल्याने हिंदुस्तान सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र एक खराब फटका खेळून अश्विन बाद झाला आणि त्या पाठोपाठ आकाशदीप घरी परतला. त्यानंतर एजाज पटेलने सुंदरचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडला सामना जिंकून दिला.

पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या एजाज पटेल याने दुसऱ्या डावातही विकेटचा षटकार ठोकला. तर ग्लेन फिलिप्स याने तीन तर मॅट हेन्द्रीयाने एक विकेट त्याला उत्तम साथ दिली. दोन्ही डावात मिळून 11 विकेट घेणाऱ्या एजाज पटेल याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.