IND vs NZ Test – दुष्काळ संपला! न्यूझीलंडनं 36 वर्षानंतर हिंदुस्थानमध्ये कसोटी सामना जिंकला

न्यूझीलंडने 36 वर्षाचा दुष्काळ संपवत हिंदुस्थानमध्ये कसोटीमध्ये विजय मिळवला आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने यजमान हिंदुस्थानचा 8 विकेट्सने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात शतकी (134) आणि दुसऱ्या डावात नाबाद 39 धावांची खेळी करणारा रचिन रविंद्र विजयाचा शिल्पकार ठरला.

पहिल्या डावात पाट्या टाकल्यानंतरही दुसऱ्या डावात केलेल्या दमदार कमबॅकनंतर हिंदुस्थानने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला खाते उघडण्याआधीच धक्का बसला.

कर्णधार टॉम लेथम शून्यावर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड कॉन्वे याचाही अडसर बुमराहने दूर केला. यामुळे काही काळ सामन्यात रंगत निर्माण झाली होती. मात्र विल यंग (नाबाद 48) आणि रचिन रविंद्रने (नाबाद 39) हिंदुस्थानच्या फिरकीपटूंना फोडून काढत न्यूझीलंडला हिंदुस्थानमध्ये 36 वर्षानंतर कसोटी सामना जिंकून दिला.

याआधी 1988 मध्ये न्यूझीलंडने वानखेडेवर झालेल्या कसोटी लढतीत हिंदुस्थानचा 136 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर न्यूझीलंडला एकही सामना जिंकता आला नव्हता. या दरम्यान न्यूझीलंडने 10 सामने गमावले होते, तर 9 अनिर्णित राहिले होते.

धावफलक –

हिंदुस्थान – 46 आणि 462
न्यूझीलंड – 402 आणि 2 बाद 110