अखेर 14 महिन्यांनंतर हिंदुस्थानचा पराभव

मायदेशात सलग दहा टी -20 सामने अपराजित असलेल्या हिंदुस्थानची विजयाची मालिका पाहुण्या इंग्लंडने खंडित केली. राजकोटवर विजयाची हॅटट्रिक साजरी करत मालिका जिंकण्याचे हिंदुस्थानचे स्वप्न इंग्लिश संघाने 26 धावांनी धुळीस मिळवत पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील आपल्या विजयाचे खाते उघडले. आता चौथा सामना पुण्यात आणि पाचवा मुंबईत खेळला जाणार आहे.

हिंदुस्थानचा संघ 28 नोव्हेंबर 2023 ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मायदेशात अखेरचा हरला होता. त्यानंतर सलग दहा सामन्यांत हिंदुस्थान अपराजित होता. त्यापैकी सलग चार विजयानंतर पाचवा सामना टाय झाला आणि मग सलग पाच विजय नोंदवले. मात्र आज विजयाची हॅटट्रिकसह मालिका जिंकण्याचे ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानला इंग्लंडने सहज नमवत आपले मालिकेतील आव्हान जिवंत राखले. हिंदुस्थान हरूनही वरुण चक्रवर्थीला ‘सामनावीर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पहिल्या सामन्यातही तोच ‘सामनावीर’ होता.

वरुण चक्रवर्थीची मेहनत वाया

गेल्या दोन सामन्यांत प्रभावी फिरकी करणाऱ्या वरुण चक्रवर्थीने आज 24 धावांत 5 विकेट घेत इंग्लंडची 8 बाद 127 अशी केविलवाणी अवस्था केली होती. त्याने आपल्या दहा चेंडूंच्या माऱयात 5 धावांत 4 विकेट टिपल्या होत्या. मात्र त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने रवी बिष्णोईच्या एका षटकात तीन षटकार खेचत संघाला 146 पर्यंत नेले. तो 24 चेंडूंत 5 षटकार खेचत 43 धावांवर बाद झाला. या फटकेबाजीनंतर इंग्लंडच्या मार्क वूड आणि आदिल राशीद या शेवटच्या जोडीने 24 धावांची अभेद्य भागी रचत संघाची धावसंख्या 171 पर्यंत ताणली. सलामीवीर बेन डकेटने तडाखेबंद 51 धावा केल्या होत्या.

हिंदुस्थानचे सारेच अपयशी

इंग्लंडच्या शेवटच्या दोन जोडींनी केलेल्या 44 धावांची भर हिंदुस्थानला महागात पडली. त्यातच आज ना संजू सॅमसनची बॅट तळपली, ना अभिषेक शर्माने चौकार-षटकारांची आतषबाजी केली, ना तिलक वर्मा खेळला. सूर्यकुमार यादवचा अपयशी खेळींचा पाढा या सामन्यातही कायम राहिल्यामुळे आज एकही संकटमोचक हिंदुस्थानी संघाच्या मदतीला धावून आला नाही. हार्दिक पंडय़ाने 40 धावा केल्या, पण तो संघाला विजयासमीप नेईल, असे वाटलेच नाही. अखेर पहिल्या आठ षटकांत सामना गमावलेल्या हिंदुस्थानने केवळ आपल्या पराभवाचे धावांचे अंतर कमी केले.