हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यान येत्या 31 जानेवारीला पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर चौथा टी-२० क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी हे स्टेडियम सर्व सुविधांनी सज्ज करण्यात आले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, पार्किंग सुविधा, स्वच्छतागृहे, पत्रकार परिषद कक्ष, पिण्याचे पाणी आणि सुरक्षितता याबरोबरच वाहतूक नियमन व व्यवस्थापनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांच्या वाहनांसाठी 45 एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. वाहनांच्या मार्गदर्शनासाठी पार्किंगमधील स्थळांबरोबरच मार्गांची आखणी करण्यात आली आहे.