बाराबती स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी

हिंदुस्थानात क्रिकेटची क्रेज किती प्रचंड आहे याची अवघ्या जगाला कल्पना आहे. मात्र येत्या 9 फेब्रुवारीला कटकच्या बाराबती स्टेडियमला हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात होणाऱया दुसऱया एकदिवसीय सामन्यांच्या ऑफलाईन तिकिटांसाठी सुमारे 50 हजार क्रिकेट चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळल्यामुळे चेंगराचेंगरीची घटना होता झाली. ओडिशा क्रिकेट संघटनेने तिकीट विक्रीसाठी गर्दी होणार याची कल्पना असतानाही अपुरी सुविधा आणि चुकीचे नियोजन केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याची टीका चोहोबाजूंनी होत आहे. मंगळवारी रात्रीपासूनच 25 हजारांपेक्षा अधिक लोकांनी स्टेडियमबाहेर मुक्काम केला होता. त्यामुळे तिकीट विक्रीला क्रिकेट चाहत्यांचा जनसागर लोटणार याची साऱयांना कल्पना आली होती. तरीही संघटनेने कोणतीही व्यवस्था केली नाही. असह्य उकाडय़ामुळे चाहते तहानेने व्याकुळ झाले होते. अनेकांना पाण्याअभावी भोवळ आली. तसेच प्रचंड गर्दीमुळे तिकीट खिडकीवर चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवल्यामुळे पोलीसही हतबल झाले होते. अखेर जादा फौजफाटा मागवून गर्दीवर पाण्याचा मारा आणि सौम्य लाठीहल्ला करत नियंत्रण मिळवण्यात आले. यात काही क्रिकेटप्रेमी जखमी झाल्याचेही वृत्त आहे.