टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 2 विकेटने पराभव केला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. तिलक वर्माने या सामन्यात तुफान फटकेबाजी करत 55 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा चोपून काढल्या आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तिलक वर्माने आपल्या तोडफोड फलंदाजीचे श्रेय कर्णधार सूर्यकुमार यादवला दिले आहे.
मागील वर्षी झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिलक वर्माची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी तिलक वर्माला मिळाली होती. परंतु सुरुवातीच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये त्याचा खेळ अगदीच सुमार राहिला. त्यामुळे तिलकने कर्णधार सूर्यकुमारला विनंती केली, पुढील सामन्यासाठी मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवावे. सूर्यकुमार स्वत: तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत होता. पंरतु त्याने तिलक वर्माला आपल्या जागी पाठवत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. सूर्यकुमार यादवचा हा निर्णय टीम इंडियासाठी आणि तिलक वर्मासाठी महत्त्वपूर्ण ठरला. त्यानंतर त्याने सलग दोन सामन्यांमध्ये 107 आणि 120 धावांची वादळी खेली. यावेळी तिलक वर्माने आपल्या विस्फोटक खेळीचे आणि तिसऱ्या क्रमांकवर उतरवण्याचे सर्व श्रेय सूर्यकुमार यादवला दिले होते.
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी20 मालिकेत याची पुनरावृत्ती पहायला मिळाली. पहिल्या टी20 सामन्यात चौथ्या क्रमांकावर आलेला तिलक वर्मा फक्त 19 धावांवर माघारी परतला. परंतु चेन्नई टी-20 मध्ये तिलकला तिसऱ्या क्रमांकावर उतरवण्यात आले आणि त्याने 72 धावांची विस्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.