IND Vs AUS – ऑस्ट्रेलियाने केला सुपडा साफ अन् ICC ने सुनावली टीम इंडियाला शिक्षा, वाचा नेमकं काय झालं

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पार पडलेल्या तिसऱ्या वनेड सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत 0-3 अशा फरकाने मालिका खिशात घातली. स्मृती मनधनाने या सामन्यात एकाकी झुंज देत 14 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 105 धावा केल्या परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे टीम इंडियाचा संपूर्ण संघ 215 धावांवर बाद झाला. या पराभवासह टीम इंडियाने मालिकासुद्धा गमावली आहे. पराभवाची जखम ताजी असतानाच ICC ने जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत टीम इंडियाला दणका दिला आहे.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रिलेया या महिला संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पर्थमध्ये पार पडला. पहिले दोन सामने गमावल्या नंतर टीम इंडिया या सामन्यात कमबॅक करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 298 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला  215 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि ऑस्ट्रेलियाने 83 धावांनी सामना जिंकत 0-3 अशा फरकाने मालिकाही जिंकली.

या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने वेळेमध्ये षटके पूर्ण केली नाहीत. त्यामुळे ICC आचारसंहितेच्या कलम 2.22 चे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ICC ने कारवाई करत टीम इंडियावर मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमप्रीत कौरने याला दुजोरा दिला असून शिक्षा मान्य केली आहे.