ऑस्ट्रेलियाची हॅटट्रिक, हिंदुस्थानी महिलांचा 190 धावांनी दारुण पराभव

एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघावर वर्चस्व गाजवणारा हिंदुस्थानी महिला संघ वन डे मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाने कसोटी पराभवाचा वचपा काढताना तिसऱया वन डेत हिंदुस्थानचा 190 धावांनी दारुण पराभव करत मालिका विजयाची औपचारिकताही पूर्ण केली. पहिले दोन्ही सामने सहज जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेणाऱया ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 3-0 असा धुव्वा उडवला.

कसोटीतील यशानंतर वन डेतही हिंदुस्थानी महिलाच आपले वर्चस्व प्रस्थापित करतील, असा अंदाज क्रिकेटतज्ञांनी व्यक्त केला होता, मात्र ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिन्ही सामन्यांत दिमाखदार विजय मिळवत सर्वांचे अंदाज फोल ठरवले.

ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी घेतल्यामुळे आजचा सामना हा हिंदुस्थानी महिला संघासाठी अस्तित्वाच्या लढाईचाच होता. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी आज हिंदुस्थानी महिला संघ मैदानात उतरला होता, मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळापुढे हिंदुस्थानी संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी निप्रभ ठरली. नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने हिंदुस्थानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 50 षटकांत ऑस्ट्रेलियाने 338 धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फोबी लिचफिल्डने हिंदुस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. फोबीने 125 चेंडूंत 16 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 119 धावांची तुफानी खेळी केली. फोबीला कर्णधार अलिसा हिलीने 82 धावांची सुरेख साथ दिली. मात्र फोबी आणि हिली बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजाला मैदानावर अधिक काळ तग धरता आला नाही. मात्र हिंदुस्थानचे खराब क्षेत्ररक्षण आणि तब्बल 28 अतिरिक्त धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 338 धावांपर्यंतचा टप्पा गाठला.

339 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानची फलंदाजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या वादळात अक्षरशः उडून गेली. जॉर्जिया वेअरहॅम, ऍनाबेल सदरलॅण्ड, अलाना किंग, मेगन शट यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे हिंदुस्थानचा डाव 148 धावांतच गुंडाळला गेला. वेअरहॅमने तीन आणि शट, सदरलॅण्ड, किंग यांनी प्रत्येकी दोन विकेट टिपले. हिंदुस्थानकडून स्मृती मानधनाने 29, जेमीमा रॉड्रिग्ज 25 आणि दीप्ती शर्माने 25 धावांचे योगदान दिले.