IND Vs AUS – इरफान पठान विराट कोहलीवर भडकला, संघातील स्थानाबाबात उपस्थित केले प्रश्चचिन्ह

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पार पडलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना सिडनीमध्ये खेळवला गेला. या सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 विकेटने पराभव केला आणि 3-1 अशा फरकाने मालिका जिंकली. टीम इंडियाचा हा पराभव चाहत्यांसह सर्वांच्या जिव्हारी लागला आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठान विराट कोहलीवर चांगलाच भडकला असून, अशा वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान दिले पाहिजे का? असा थेट सवाल त्याने उपस्थित केला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकल्यानंतर पुढील चारही कसोटी सामन्यांमध्ये विराटच्या बॅटला काही चेंडू लागला नाही. त्याने पाच सामन्यांमध्ये फक्त 190 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. इरफान पठाननेही विराट कोहलीचा खरपूस समाचार घेतला आहे. तो म्हणाला की, सुपरस्टार संस्कृती संपुष्टात आली पाहिजे, संघ संस्कृतीची गरज आहे. खेळामध्ये तुम्हाला सुधारणा करावी लागणार आहे. या मालिकेपूर्वी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची त्यांना संधी होती, परंतु ते खेळले नाहीत. या संस्कृतीत बदल झाला पाहिजे, अशी मागणी त्याने केली आहे.

विराट कोहलीने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटचा सामना कधी खेळला होता? या गोष्टीला एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. 2024 मध्ये पहिल्या डावात विराट कोहलीची सरासरी 15 होती. मागील पाच वर्षात त्याची सरासरी 30 पेक्षाही कमी आहे. अशा वरिष्ठ खेळाडूला हिंदुस्थानी संघात स्थान दिले पाहिजे का? त्यापेक्षा 25-30 च्या सरासरीने धावा करणाऱ्या एखाद्या युवा खेळाडूला संघात स्थान दिले पाहिजे, असा टोला इरफान पठानने लगावला आहे.

विराट कोहलीने टीम इंडियासाठी खूप काही केले आहे. अनेकवेळा चांगली कामगिरी केली आहे. परंतु सारखं-सारखं एकच चुक फलंदाज करत आहे. तुम्ही या तांत्रिक गोष्टींना सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही आहात. सुनील गावस्कर या ठिकाणी आहे. त्यांच्याशी किंवा इतर कोणाशी चर्चा करायला असा किती वेळ लागतो, असे इरफान पठान म्हणाला आहे.