हिंदुस्थानचा सलामीचा प्रश्न बिकटच; फलंदाजीच्या अपयशानंतरही भाग्य फळफळण्याची शक्यता

न्यूझीलंडविरुद्धच्या तिन्ही कसोटींत रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल ही जोडी दमदार सलामी देण्यात अपयशी ठरलीय. त्यामुळे सध्या हिंदुस्थानचा सलामीचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. त्यातच आता पर्थ कसोटीत रोहित शर्मा खेळण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्याच्या जागी ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध अपयशी ठरलेल्या केएल राहुल आणि अभिमन्यू ईश्वरनपैकी एकाचे भाग्य फळफळण्याची शक्यता आहे.

गेल्या पाचही कसोटींत हिंदुस्थानच्या सलामीच्या जोडीला शतकी भागी देण्यात अपयश आले आहे. यशस्वी जैसवालने आपल्या फलंदाजीतले सातत्य कायम राखले असले तरी रोहितचा अतिआक्रमकपणा न्यूझीलंडविरुद्ध संघाला महागात पडला आहे. गेल्या पाच कसोटींत रोहितच्या बॅटीतून एकदाच 52 धावांची खेळी निघाली. तीच त्याची गेल्या पाच कसोटींतील सर्वोच्च खेळी ठरली आहे. रोहित आणि जैसवालला सलामीला उतरविण्यासाठी शुभमन गिलला तिसऱया स्थानावर खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रोहितच्या अनुपस्थितीची चर्चा सुरू झाल्यामुळे सलामीवीर म्हणून केएल राहुलचा पर्याय समोर ठेवत त्याला ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध खेळण्यासाठी पाठवण्यात आले, पण राहुल या अनौपचारिक कसोटीच्या दोन्ही डावांत 0 आणि 10 या अपयशी खेळय़ा करू शकला. तसेच एक आशा असलेल्या अभिमन्यू ईश्वरननेही सलामीला येऊन घोर निराशा केली. गौतम गंभीर यांच्या मते हिंदुस्थानकडे सलामीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी सारेच अपयशाच्या गर्तेत अडकले आहेत. संघाची सद्यस्थिती पाहता वशिल्याच्या जोरावर संघात आतबाहेर होत असलेला राहुल पर्थवर सलामीला उतरला तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही.

जुरेलच्या कामगिरीवर दुर्लक्षच 

हिंदुस्थानी अ संघात खेळता यावे म्हणून राहुलच्या सोबत ध्रुव जुरेललाही ऑस्ट्रेलियात पाठवण्यात आले होते तेव्हा सर्वांचे लक्ष फक्त राहुलवर लागले होते, पण तेव्हा ध्रुव जुरेलने झुंजार खेळ केला. त्याने एमसीजीवर झालेल्या या कसोटीत 80 आणि 68 धावांची खेळी करून संघाला सावरण्याचा संघर्ष केला. एकीकडे राहुलला संघात घुसवण्याचा प्रयत्न केला जात असताना जुरेलकडे मात्र दुर्लक्ष करण्याचा प्रकार केला जात आहे. या झुंजार यष्टिरक्षक फलंदाजालाही केवळ फलंदाज म्हणून खेळवता येऊ शकते, असा विचार केला तर हिंदुस्थानला एक चांगला फलंदाजही मिळू शकतो, पण तूर्तास असा विचार होण्याची सुतराम शक्यता नाही.

शुभमन गिलचाही पर्याय

रोहित शर्माच्या गैरहजेरीत शुभमन गिल आणि यशस्वी जैसवाल ही सलामीची जोडी पर्थवर उतरविण्याचीही शक्यता आहे. जर गिल सलामीला उतरला तर त्याच्या जागेसाठी पुन्हा राहुलचीच वर्णी लागू शकते. सोबतीला सरफराज खानचे अपयश आणि त्याचे खेळण्याचे तंत्र ऑस्ट्रेलियात कितपत यशस्वी ठरेल, याबाबत अनेक साशंकता असल्यामुळे त्यालाही बाहेर बसवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीतही राहुलचाच पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे अपयशी असूनही राहुलला संघात ठेवले तर संघ व्यवस्थापनाची काही खैर नाही.