टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मेलबर्न येथे चौथा कसोटी सामना सुरू आहे. 26 डिसेंबरला सुरू झालेला हा सामना आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात झालेली घसरगुंडी तळाचे फलंदाज बोलंड आणि लायन यांनी सावरली. दोघांनी 10 व्या विकेटसाठी अर्धशतकीय भागी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसा अखेर 9 गड्यांच्या मोबदल्यात 228 धावा करत 333 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार हे उद्या स्पष्ट होईल.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात सर्व गडी बाद 369 धावा केल्या. पहिल्या डावात फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीने (114 धावा) आपल्या कसोटी कारकिर्दीतले पहिले शतक ठोकत ऐतिहासिक कामगिरी केली. टीम इंडिया 369 धावांवर बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची आघाडी होती. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात मात्र खराब झाली. 91 या धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाचे 6 गडी तंबुत परतले होते. बुमराने आपला जलवा पुन्हा एकदा दाखवला आणि ऑस्ट्रेलियाचे चार मोहरे अचूक टिपले. सिराजने तीन तर जडेजाने पॅट कमिंन्सचा (41 धावा) महत्त्वाचा विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 173 या धावसंख्येवर नववा हादरा दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 200 च्या आतमध्येच बाद होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु तळाचे फलंदाज नॅथन लायन (54 चेंडू 41 धावा) आणि बोलंड (65 चेंडू 10 धावा) यांनी संयमी फलंदाजी केल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिवसा अखेर ऑस्ट्रेलियाने 9 गड्यांच्या मोबदल्यात 228 धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाकेड 333 धावांची भक्कम आघाडी आहे.