IND VS AUS – टीम इंडियाचा 184 धावांनी दारुण पराभव, ऑस्ट्रेलियाने सामना जिंकत WTC Final च्या दिशेने टाकले पाऊल

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मेलबर्न येथे चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 184 धावांनी दारुण पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला जिंकण्यासाठी 340 धावांचे आव्हान दिले होते. परंतु टीम इंडियाचा संपूर्ण संघ 155 या धावसंख्येवर बाद झाला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाच दुसऱ्या डाव 234 या धावसंख्येवर संपुष्टात आला. त्यामुळे टीम इंडियाचा जिंकण्यासाठी 340 धावांचे आव्हान मिळाले होते. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात मात्र अत्यंत खराब झाली. यशस्वी जयस्वालने 208 चेंडूंचा सामना करत 8 चौकारांच्या मदतीने 84 धावा केल्या. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. ऋषभ पंतने 104 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणत्याच फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एका बाजूला कर्णधार रोहित शर्मा (9 धावा), के.एल. राहुल (0), विराट कोहली (5 धावा), जडेजा (2 धावा), नितीश कुमार रेड्डी (1 धाव), वॉशिंग्टन सुंदर (5 धावा), आकाश दिप (7 धावा) यांच्या विकेट पडत होत्या. तर दुसरीकडे यशस्वी एकाकी झुंज देत होता. इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिंन्स आणि बोलंड यांनी 3-3 विकेट घेतल्या. तसेच लायन ने 2 आणि ट्रेव्हिस हेड व मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्तुत्तरात टीम इंडियाला नितीश कुमार रेड्डीच्या (114 धावा) शतकीय खेळीमुळे पहिल्या डावात 369 धावांपर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना झटकीपाट बाद करण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना यश आले. बुमराने पाच विकेट घेत ऑस्ट्रेलियाला एका मागे एक हादरे दिले. त्यामुळे 91 या धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबुत परतला होता. परंतु बोलंड आणि लायन यांनी केलेल्या बचावात्मक फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 234 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे टीम इंडियाचा जिंकण्यासाठी 340 धावांचे आव्हान मिळाले होते.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर करंडकातील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनी येथे रंगणार आहे. या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पुनरागन करून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. सध्या ऑस्ट्रेलिया 2-1 अशी आघाडीवर आहे. पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली आणि तिसरा सामना अनिर्णित सुटला होता. त्यामुळे पाचवा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.