टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये गॅबा येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. टीम इंडियाचा पहिला डाव सुरू असून ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यामुळे टीम इंडियाच्या झटकीपट विकेट गेल्याने टीम इंडियावर फॉलोऑनचे संकट निर्माण झाले होते. परंतु टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि आकाश दीप यांनी 39 धावांची महत्त्वपूर्ण भागी करत टीम इंडियाला फॉलोऑनपासून वाचवले आहे.
टीम इंडियाला फॉलोऑन पासून वाचण्यासाठी 246 धावांची गरज होती. परंतु 213 धावसंख्येवर टीम इंडियाचे 9 गडी तंबूत परतले होते. रविंद्र जडेजाने 123 चेंडूंचा सामना करत 77 धावांची खेळी करत संघाला मजबूत स्थितीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. जडेजा बाद झाल्यानंतर बुमरा आणि आकाश दीप यांनी संघाची सुत्र आपल्या खांद्यावर घेत महत्त्वपूर्ण 39 धावांची भागी करत संघाला फॉलोऑन पासून वाचवले आहे. बुमराने 27 चेंडूंमध्ये एका षटकाराच्या मदतीने 10 धावा तर, आकाश दीपने 31 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि एका षटकारच्या मदतीने 27 धावांची खेळी केली असून दोघेही नाबाद आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला असून टीम इंडियाने 9 गड्यांच्या मोबदल्यात 252 धावा केल्या आहेत. अजूनही टीम इंडिया 193 धावांनी पिछाडीवर आहे.