
कामगारांची देणी देण्यासाठी बेस्टने आज राज्य सरकारकडे 1 हजार 658 कोटी रुपयांची मागणी केली. तसेच बेस्टचे उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली वांद्रे, दिंडोशी व देवनार बस डेपो भाडेतत्त्वावर देण्याचे धोरण आखण्यात येत आहे. त्याचबरोबर बेस्टच्या पाच डेपोंमध्ये चित्रपटासाठी थिएटर बांधण्यात येणार आहे.
बेस्टच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली होती. बांद्रा, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्त्वावर देताना धोरण ठरवावे. त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. रेल्वे, मेट्रो, मोनोरेल आणि बस सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याची प्रणाली तयार होत असून नागरिकांना एकाच तिकिटामध्ये प्रवास करता येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी बेस्टचे व्यवस्थापक श्रीनिवास यांनी टोल माफ करण्याची व कर्मचाऱयांच्या देण्यांपोटीचे 1658 कोटी मिळावेत अशी मागणी केली. याबाबत प्रस्ताव सादर करावेत, शासन याचा सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.