दिंडोशीकरांचा कौल विकासाच्या बाजूनेच, कुरार व्हिलेजच्या मेळाव्यात नारी शक्तीचा निर्धार; सुनील प्रभू यांना वाढता पाठिंबा

दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार सुनील प्रभू यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे त्यांना सर्व स्तरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. दिंडोशीतील मतदारांचा कौल यंदाही विकासाच्या बाजूनेच आहे. दिंडोशीत शिवसेनेची मशाल धगधगणार आणि पुन्हा एकदा सुनील प्रभू यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार, असा निर्धार नारी शक्तीने व्यक्त केला.

दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी कुरार व्हिलेज येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या, खासदार प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, काँग्रेसच्या डॉ. अजंता यादव, माजी महापौर निर्मला प्रभावळकर, सीमा सिंग, समाजवादी पक्षाच्या सुनैना विश्वकर्मा, विभाग संघटक साधना माने यांच्यासह शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि दिंडोशी विधानसभेतील शेकडो महिला उपस्थित होत्या.

जाहिरातबाजीवर उधळपट्टी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांपेक्षा त्याच्या जाहिरातीवर राज्य सरकारकडून जास्त खर्च करण्यात आला आहे, अशी टीका खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यापेक्षा महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करा, असे काँग्रेसच्या सीमा सिंग म्हणाल्या.

महाभ्रष्ट सरकार उलथवून टाका

महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे. प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत त्यामुळे हे महाभ्रष्ट सरकार उलथवून टाका, असे निर्मला प्रभावळकर म्हणाल्या. महागाई कमी करायची असेल तर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणावेच लागेल, असे ज्योती ठाकरे म्हणाल्या.

मालाड रेल्वे स्थानक ते कुरार गावाला जोडणारा सब वे, आप्पा पाडा येथे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, त्रिवेणी नगर येथे डायलिसिस केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 400 हून अधिक सभा मंडपांची उभारणी, पश्चिम द्रुतगती मार्गावर वातानुकूलित शौचालयाची उभारणी अशा आपल्या कार्यकाळातील अनेक विकासकामांची माहिती सुनील प्रभू यांनी यावेळी दिली.