राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ; कल्याणनंतर राजगुरूनगरमधील घटनेवरून रोहित पवार यांनी महायुती सरकारवर केली टीका

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अलीकडेच कल्याणमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच राजगुरूनगरमध्येही दोन सख्या बहिणींची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आली. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

‘एक्स’वर एक पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, ”कल्याणमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून खून केलेल्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच राजगुरूनगरमध्येही अशाच प्रकारे 8 आणि 9 वर्षांच्या सख्या चिमुकल्या बहिणींचा निर्घृण खून केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. गेल्या काही दिवसांत हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.”

ते पुढे म्हणाले की, ”परभणीप्रमाणे पोलिसी बळाचा गैरवापर झाला नाही पाहिजे, पण पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकही राहिला पाहिजे आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाकही राहिला पाहिजे. पण तसं होताना आज दिसत नाही आणि आज हे रोखलं नाही तर उद्या ते हाताबाहेर जाऊ शकतं. म्हणून सरकारने आज प्राधान्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सरकारची पॉवर आणि कायद्याचा धाक काय असतो, हे दाखवून देण्याची गरज आहे.”