मुंबईला विषारी धुरक्याचा वेढा! दिवसभर सूर्यदर्शन नाही, दृश्यमानता घटली

शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या प्रदूषणाचा आता कहर होण्यास सुरुवात झाली असून विशेषतः दक्षिण मुंबईसह शहर आणि पश्चिम उपनगरला आज अक्षरशः विषारी धुरक्याचा वेढा पडला. धूळ आणि धुरक्यामुळे दृश्यमानताही कमी झाली. अगदी काही मीटर अंतरावरील इमारतीही दिसणेही मुश्कील झाले होते. अनेक भागांत दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही. विषारी धुरक्यामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाली असून पालिका रुग्णालयांत अशा रुग्णांची संख्या 25 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

मुंबईत हवेचा पारा घसरत असताना हवेतील आर्द्रता वाढल्याने वातावणात धूळ थांबून राहत आहे. यातच समुद्राकडून येणाऱया बाष्पयुक्त वाऱयांमुळे हवेतील आर्द्रता वाढत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. ही स्थिती अजून आठवडाभर कायम राहण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये रुग्णांच्या रांगा लागत आहेत.

बोरिवली, मालाड, कुलाबा सर्वाधिक प्रदूषित

मुंबईमध्ये आज अनेक विभागांत एअर क्वालिटी इंडेक्स वाढलेला दिसून आला. यामध्ये बोरिवलीत एक्यूआय 209, देवनार येथे 201, मालाड पश्चिम 266, माझगाव – 209, कुलाबा नेव्ही नगर – 270 आणि वरळी सिद्धार्थनगर येथे 202 इतका एक्यूआय नोंदवला गेला. या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार या ठिकाणच्या हवेची गुणवत्ता ‘खराब’ नोंदवली गेली. यामध्ये कुलाब्याची हवा सर्वाधिक खराब नोंद झाली.

वातावरणातील गारव्यापासून वाचण्यासाठी उबदार कपडे घालावेत. शक्यतो थंड वातावरणापासून बचाव करावा. थंड पदार्थ खाण्यावर मर्यादा असावी. विशेष म्हणजे कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास कोणतीही हलगर्जी न करता तातडीने पालिका अथवा खासगी दवाखान्यात डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डॉ. मोहन जोशी, डीन, शीव रुग्णालय