वाशिष्ठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन पिढी पुढे नेण्याचे काम सुरू आहे. हे प्रदर्शन तुम्ही दरवर्षी आयोजित करा. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती द्या. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये आधुनिकता आणा आणि शेतीचे उत्पादन वाढवा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते रविवारी चिपळूण येथे आयोजित वाशिष्ठी कृषी प्रदर्शनात बोलत होते.
चिपळूण येथील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर मैदानात वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रा.लि.च्या वतीने वाशिष्ठी कृषी आणि पशुसंवर्धन प्रदर्शन आयोजित केले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद पवार म्हणाले की, मी जेव्हा कृषीमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा देशात फक्त दोन महिने पुरेल इतकाच अन्नधान्य साठा होता. त्यावेळी परदेशातून धान्य आयात करण्याची एक फाईल माझ्यासमोर आली होती. तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फोन करून माझ्याशी याबाबत चर्चा केली होती. तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच घ्याल असे ते मला म्हणाले होते. त्यावेळी या परिस्थितीवर आम्ही गांभीर्यांने विचार केला. तेव्हा कर्ज थकबाकीचा एक रोग शेतीला लागला आहे. कर्ज थकीत झाल्याने बॅंक पुन्हा शेतकऱ्याला कर्ज देत नाही. त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होऊ लागला. म्हणून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यानंतर शेतीचे उत्पादन वाढविण्यात भर दिला. काही दिवसात जो तांदूळ आपण आयात करत होतो त्या तांदळाच्या उत्पादनात आपला पहिला क्रमांक मिळवला. आपण तांदूळ 18 देशांना निर्यात करू लागलो, असे शरद पवार म्हणाले.
आता थांबायचे नाही, कामाला लागा
वशिष्ठीची जी उत्पादने आहेत त्यांचा दर्जा पाहिला तर ती लवकरच लोकप्रिय होंऊन अन्य राज्यात आणि देशाबाहेर विक्रीसाठी पोहचतील, असा मला विश्वास आहे. या कृषी प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. हे प्रदर्शन दरवर्षी भरावा. पुढच्या वर्षी मोठ्या जागेत भरावा. तिथे नवीन बियाणाचे उत्पादन कसे येते याचे प्रात्याक्षिक दाखवा. जेणेकरून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नवीन बियाणांचा वापर करावा. आता थांबायचे नाही कामाला लागायचे असा सल्लाही शरद पवारांनी दिला.यावेळी वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रा.लि.चे अध्यक्ष प्रशांत यादव प्रशांत यादव यांनी वाशिष्ठीच्या कार्याचा अहवाल सादर केला.ते म्हणाले आम्ही 160 लीटर दूध संकलित करून सुरूवात केली आज आम्ही 47 हजार लीटर दूध संकलित करतो.
लीटर मागे दहा रूपये मिळवून देणार- भास्कर जाधव
कोकणात जो फळबागातून रोजगार निर्माण झाला आहे त्याचे श्रेय माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांना आहे. त्यांच्याकडे मत्स्य खाते होते. कोकणातील बंदरांना एनओसी त्यांनीच मिळवून दिली. शेतकऱ्यांना लीटर मागे दहा मिळून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यात वाशिष्ठी मिल्क डेअरीचा समावेश असेल, असे आश्वासन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी दिले.