
युनिव्हर्सल फुटपाथ धोरणाची घोषणा करण्यात आली. मात्र अंधेरी-कुर्ला रोडवरील सफेद पूल परिसरात या धोरणाला हरताळ फासण्यात आला आहे. परिणामी रहिवाशांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याकडे अॅड. नरेश दहीबावकर यांनी मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांचे लक्ष वेधत येथे फुटपाथची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
मुंबई पालिकेने मोठा गाजावाजा करीत घोषणा केलेल्या युनिव्हर्सल फुटपाथ धोरणाची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. पदपथाची रुंदी कमी असणे, कुंपण किंवा कठडा नसणे किंवा पदपथ नसणे अशा परिस्थितीत चालणेही कठीण होते. यामध्ये गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांची गैरसोय होत असल्याने पालिकेकडे या सर्वांना विचारात घेऊन पदपथ आणि त्यावर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी युनिव्हर्सल फुटपाथ धोरण आखून नियमावली करण्यात आली होती, मात्र सफेद पुलावर पदपथाची उभारणी केलेली नाही. यामुळे रहिवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय.