निवडणुकीपूर्वी झारखंडमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे स्वीय सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर आयकर विभागाने शनिवारी छापेमारी केली आहे. हवालाद्वारे पैसे हस्तांतरीत झाल्याची माहिती प्राप्त होताच आयकर विभागाने श्रीवास्तव यांच्याशी संबंधित ठिकाणी छापे टाकले.
श्रीवास्तव यांच्याशी संबंधित रांचीमधील सात आणि जमशेदपूरमधील नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले. सुनील श्रीवास्तव हे हेमंत सोरेन यांचे स्वीय सचिव असण्यासोबतच झारखंड मुक्ती मोर्चाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि पक्षाचे स्टार प्रचारक देखील आहेत.
झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका
झारखंडमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना आयकर विभागाने मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सचिवाच्या घरावर छापे टाकले. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील आणि 20 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.