लोकसभेत भाजपच्या विरोधात काम, संजीवराजे निंबाळकरांच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्सचे छापे

विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे चुलतबंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी तसेच फलटणमधील घर आणि मालमत्तांवर बुधवारी सकाळी आयकर विभागाने धाड टाकली. प्रभात रस्त्यावरील बंगल्यात ही छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर संजीवराजे निंबाळकर यांनी अजित पवार यांना साथ दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीत असतानाही त्यांनी भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत रामराजे आणि संजीवराजे या दोन्ही बंधूंनी भाजपच्या उमेदवाराला शेवटपर्यंत पाठिंबा दिला नाही. तर, विधानसभा निवडणुकीपूर्वी संजीवराजे निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच आज त्यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.