
देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोवर आयकर विभागाने मोठा दंड ठोठावला आहे. प्राप्तिकर विभागाने इंडिगोला 944.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. इंडिगोच्या मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला याबाबत नोटीस प्राप्त झाली आहे. मात्र इंडिगो हा दंड नाकारला नसून या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. कंपनीने म्हटले आहे की, आयकर विभागाच्या या आदेशाचा विमान कंपनीच्या कामकाजावर, वित्तव्यवस्थेवर आणि इतर कामांवर कोणताही परिणाम होणार नाही.
कंपनीने याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, आयकर विभागाने 2021-22 या वर्षासाठी 944.20 कोटी रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश जारी केला आहे. हा आदेश चुकीच्या समजुतीच्या आधारे पारित करण्यात आला आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे. इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, कलम 143(3) अंतर्गत कर निर्धारण आदेशाविरुद्ध कंपनीने आयकर आयुक्त यांच्यासमोर दाखल केलेली अपील फेटाळण्यात आली, असा त्यांचा समज झाल्याने हा आदेश पारित करण्यात आला. मात्र तसं नसून याबाबतचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे.
दरम्यान, इंडिगो आधीच आर्थिक आव्हानांना तोंड देत असताना हा दंड ठोठावण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत इंडिगोचा निव्वळ नफा 18.6 टक्क्यांनी कमी झाला. या कालावधीत एअरलाइनचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या 2,998.1 कोटी रुपयांवरून 2,448.8 कोटी रुपयांवर घसरले आहे.