प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने आदिवासी मातेचा तीन रुग्णालयांमध्ये फरफट होऊन रस्त्यातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. मोखाड्यापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलद्याचा पाडा येथे राहणारी ही महिला असून आशा भुसारे (२२) असे तिचे नाव आहे. या घटनेत नवजात बाळ बचावले आहे. डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळेच मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मोहांडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोलद्याचा पाडा असून तेथे राहणारी आशा भुसारे ही महिला २५ डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास प्रसूतीसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. दिवसभर तिच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबरला सकाळी ९ च्या सुमारास तिची प्रसूती होऊन तिने एका गोंडस बालकाला जन्म दिला. त्यानंतर काही वेळाने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाल्याने आशा हिला प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तिथे तिला रक्ताच्या चार बाटल्यादेखील दिल्या. तरीही रक्तस्त्राव थांबला नाही.
आशा भुसारे हिला वेदना असह्य होऊ लागल्याने डॉक्टरांनी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नाशिकला घेऊन जात असताना रस्त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान माझ्या पत्नीची नॉर्मल प्रसूती होऊनही डॉक्टर व नर्स यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने रक्तस्त्राव झाला. त्यानंतरही खूप विलंब लावण्यात आला. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वेळीच पोहोचलो असतो तर माझ्या पत्नीचा जीव वाचला असता. याप्रकरणी सखल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी मृत आशाचे पती नंदकुमार भुसारे यांनी केली आहे.