जम्मू-कश्मीरमधील गांदरबल जिह्यातील बहुप्रतीक्षित ‘झेड-मोढ’ बोगद्याचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जितेंद्र सिंह, एलजी मनोज सिन्हा तसेच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला उपस्थित होते. 6.4 किमी लांबीचा हा बोगदा श्रीनगर-लेह महामार्ग एनएच-1 वर बांधण्यात आला असून तो सोनमर्गला श्रीनगरशी जोडेल. बर्फवृष्टीमुळे हा महामार्ग गेल्या सहा महिन्यांपासून बंद होता. मात्र आता हा बोगदा सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीत खुला राहणार आहे. झेड-मोढ बोगद्यामुळे या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
ओमर अब्दुल्लांकडून मोदींचे कौतुक
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते तथा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोदी यांची प्रशंसा केली. ‘मोदी यांनी कश्मीर आणि दिल्लीमधील अंतर कमी केले आहे. तुम्ही या बोगद्याचे उद्घाटन केले हे आमचे भाग्यच. या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या, मात्र मोदी आणि गडकरी यांनी काम वेगाने पुढे नेले. मोदींच्या प्रयत्नांमुळे सीमेवर शांतता आहे , असे अब्दुल्ला यांनी नमूद केले.
कश्मीर हिंदुस्थानचे मुकुट
‘कश्मीर हिंदुस्थानचे मुकुट असून हा मुकुट जेव्हा दागिन्यांनी सजवला जाईल तेव्हाच ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार होईल. हा मोदी आहे, वचन दिले तर ते पूर्ण करतो. प्रत्येक कामाची एक वेळ आहे आणि योग्य वेळी योग्य काम होणार आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले.