मुंबईकरांना मिळाली निसर्गरम्य पाऊलवाट, मलबार हिलमधील निसर्ग उन्नत मार्ग प्रकल्पाचे लोकार्पण

सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात आलेल्या कमला नेहरू उद्यानाजवळ मलबार हिल येथील पहिल्या निसर्ग उन्नत मार्ग प्रकल्पाचे लोकार्पण आज करण्यात आले. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी ही संकल्पना पहिल्यांदा मांडून त्यासाठी महापालिकेची मंजुरी मिळवली होती. निसर्गाचा समतोल राखून बनवलेली ही पाऊलवाट पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने आदर्श ठरणार असून देशी-परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

मलबार हिल परिसरात निर्मित निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले. सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेच्या धर्तीवर मुंबईत पहिल्यांदाच असा मार्ग विकसित करण्यात आला आहे. निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपायुक्त शरद उघडे, उपायुक्त यतीन दळवी, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे आदी उपस्थित होते.

निसर्ग उन्नत मार्ग येथे भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन सशुल्क ऑनलाईन तिकीट काढण्याचा पर्याय आहे.

पक्षी-वनस्पती निरीक्षणाची संधी

मलबार हिलवरील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या 100 हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करण्याची संधी मुंबईकर, पर्यटकांना मिळणार आहे. हा मार्ग जमिनीपासून उंचीवर असल्यामुळे या ठिकाणच्या पक्षी-प्राण्यांना पर्यटकांचा उपद्रव होणार नाही. शिवाय उंचावरून स्वप्ननगरी मुंबईचे दर्शनही घेता येणार असून फोटो, सेल्फीही काढता येणार आहे.