
शंभू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी 14 डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्धार केला आहे. शेतकरी नेते सरवन सिंग पंधेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा केली. गेल्या 303 दिवसांपासून शेतकऱयांचे आंदोलन सुरूच असून आमरण उपोषणाचा पंधरावा दिवस आहे. शेतकऱयांना त्यांच्या मागण्यांसाठी सरकारशी चर्चा करायची आहे, मात्र अद्याप सरकारकडून कोणताही संपर्क झालेला नाही, असे पंधेर यांनी सांगितले.
आंदोलनाची पुढील दिशा सांगताना पंधेर म्हणाले की, 14 डिसेंबरला 101 शेतकऱयांचा एक गट दिल्लीकडे कूच करेल. आमच्या आंदोलनाला 303 दिवस पूर्ण झाले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या यशासाठी उद्या, बुधवारी प्रार्थना सभेचे आयोजन केले जाणार आहे. आंदोलनादरम्यान अटक केलेल्यांची सुटका करावी, ही शेतकऱयांची प्रमुख मागणी आहे. तसेच चित्रपटसृष्टीतील कलाकार, गायक आणि धार्मिक नेत्यांनी आंदोलकांना पाठिंबा द्यावा आणि आंदोलन पुढे नेण्यास मदत करण्याचे आवाहन पंधेर यांनी केले.
आमरण उपोषण कायम
खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगतीत सिंग डल्लेवाल यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मागील 14 दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे. कर्करोग आणि डायबिटीसने ग्रस्त असलेल्या डल्लेवाल यांची तब्येत बिघडत चालली आहे. आमरण उपोषणामुळे त्यांनी औषधे घेण्यासही नकार दर्शवला. त्यामुळे मंगळवारी इतरही शेतकऱयांनी या आंदोलनात सहभाग घेत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला. दरम्यान, सीमा खुल्या कराव्यात यासाठी करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आंदोलक शेतकऱयांनी मंगळवारी रणनीती ठरवू, असे सांगितले होते.