तारापूर पुन्हा स्फोटाने हादरले; पाच कामगार होरपळले, तीन गंभीर

तारापूर औद्योगिक क्षेत्रात स्फोटांची मालिका सुरूच असून आज एन झोनमधील कॅलेक्स केमिकल अॅण्ड फार्मासिटीकल कंपनीत प्रचंड स्फोट झाला. ड्रायरचे तापमान अचानक वाढल्याने आगीचा भडका उडून मोठा धमाका झाला. या दुर्घटनेत पाच कामगार होरपळले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने तारापूर एमआयडीसीमधील तुंगा हॉस्पिटल व दोन किरकोळ जखमींना बोईसर येथील पराग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एन झोनमध्ये कॅलेक्स केमिकल अॅण्ड फार्मासिटीकल ही कंपनी आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास या कंपनीत मोठा स्फोट झाला. ही दुर्घटना इतकी मोठी होती की स्फोटाच्या प्रचंड आवाजाने जवळपास ३ किलोमीटरच्या परिसराला तडाखा बसला. नेहमीप्रमाणेच कारखान्यात केमिकल उत्पादन प्रक्रिया सुरू असताना ड्रायरचे तापमान अचानक वाढल्याने हा स्फोट झाला. त्यानंतर आगीचा भडका उडून पाच कामगार होरळपले. स्फोटानंतर पेटते केमिकल अंगावर उडाल्याने राजमनी मौर्य, पवन देसले, आदेश चौधरी, निशिकांत चौधरी व संतोष हिंडलेकर असे पाच कामगार गंभीररीत्या भाजले आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान जखमींना तातडीने विविध रुग्णालयांत हलवण्यात आले.

अन्यथा मोठा अनर्थ घडला असता

स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा आगीच्या भडक्यात परिसरातील अन्य कंपन्या बेचिराख होऊन हाहाकार उडाला असता. दरम्यान तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वारंवार होणारे अपघात आणि त्यातून कामगारांचे जाणारे बळी यामुळे तारापूर एमआयडीसीतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जखमी कामगारांची उपचारासाठी फरफट

दुर्घटनेतील जखमींना तातडीची मदत मिळावी यासाठी औद्योगिक सुरक्षा विभागाचे कार्यालय वसई येथून पालघर येथे हलवण्यात आले. मात्र याचा कामगारांना काहीच फायदा झाला नसल्याचा आरोप होत आहे. अपघातातील मृत कामगारांच्या वारसांना तसेच जखमी कामगारांची उपचार आणि न्यायासाठी फरफट होत आहे.