सरस्वती, ओम साईश्वर विजेते

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र ऍमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे 14 वर्षांखालील किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत किशोरींमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळाने तर किशोरांमध्ये सरस्वती मंदिर हायस्कूलने अजिंक्यपद पटकावले.

किशोरांच्या अंतिम सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने सलग दोन अजिंक्यपद विजेत्या असलेल्या ओम साईश्वर सेवा मंडळावर 8-6 (6-4,2-2) असा दोन गुणांनी निसटता विजय मिळवला.

या सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलच्या वरुण गुप्ता (5 मि. संरक्षण व 1 गुण), प्रथमेश तर्पे (5.40 मि. संरक्षण व 4 गुण), महेक आदवडे (1.20, नाबाद 1.20 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी सरस्वतीला विजय खेचून आणून दिला. ओम साईश्वरच्या अधिराज गुरव (नाबाद 4 मि. संरक्षण व 3 गुण), श्राथिक गामी (2020, 1.40 मि. संरक्षण), आरव साटम (1.40 संरक्षण व 1 गुण), अर्णव राणे (1.20 मि. संरक्षण) यांनी दिलेली लढत व्यर्थ गेली व त्याचबरोबर ओम साईश्वर सेवा मंडळाची अजिंक्यपद मिळवण्याची हॅटट्रिकसुद्धा हुकली.

किशोरींच्या अंतिम सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने श्री समर्थ व्यायाम मंदिराला जोरदार टक्कर देत एकतर्फी विजय साजरा केला व या अजिंक्यपदाचे तेच खरे दावेदार होते हे सिद्ध करून दाखवले व पहिलेवहिले अजिंक्यपद खिशात घातले. ओम साईश्वरने श्री समर्थचा 10-4 (10-2-2) असा 1 डाव व 6 गुणांनी धुव्वा उडवत विजेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचे विश्वस्त उन्मेष नरवणे (सी. ए.) मुंबई खो खो संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख, उपाध्यक्ष बाळ तोरसकर, कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ, कार्योपाध्यक्ष विकास पाटील, खजिनदार डलेश देसाई, प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचे प्रशिक्षक नितीन पाष्टे हे उपस्थित होते.