सहा वर्षांत संपूर्ण लोकल वाहतूक स्वतंत्र ट्रॅकवर; बदलापूर-कर्जत, आसनगाव-कसारा, पनवेल-वसई ‘सुस्साट’ गाठता येणार

लोकल प्रवास सुकर करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) विविध प्रकल्प राबवत आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या ‘3-ब’ टप्प्यात बदलापूर-कर्जत, आसनगाव-कसारा व पनवेल-वसई दरम्यान लोकलच्या स्वतंत्र मार्गिकांचे काम केले जाणार आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच या कामाला गती मिळणार आहे. येत्या सहा वर्षांत हे काम पूर्ण होऊन संपूर्ण लोकल वाहतूक स्वतंत्र ट्रकवर धावण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महानगराची वाढती व्याप्ती व प्रवाशांची गरज लक्षात घेत उपनगरी रेल्वेचे जाळे विस्तारले जात आहे. एमयूटीपीच्या विविध टप्प्यांत विकासकामे करण्यात येत आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर डहाणूपर्यंतची लोकल वाहतूक मेल-एक्सप्रेसच्या अडथळ्याविना सुरू आहे. तुलनेत जास्त कार्यक्षेत्र असलेल्या मध्य रेल्वेच्या बऱयाच भागांत लोकल वाहतुकीमध्ये मेल-एक्सप्रेसचा अडसर येत आहे. त्यात बदलापूर ते कर्जत, आसनगाव ते कसारा आणि पनवेल ते वसई यादरम्यानच्या मार्गिकांचा समावेश आहे. या मार्गांवर लोकल वाहतूक मेन लाईनपासून स्वतंत्र ट्रकवर चालवण्याचा प्रस्ताव आहे. लोकलच्या स्वतंत्र मार्गिकांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने फेब्रुवारीत राज्य सरकारकडे पाठवला आहे, अशी माहिती एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी दिली. राज्याची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीला अधिक वेळ लागणार नाही. स्वतंत्र लोकल मार्गिकांचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जवळपास 14 हजार कोटींचा खर्च येणार

एमयूटीपी-3 प्रकल्पा अंतर्गत बदलापूर ते कर्जत दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका आणि आसनगाव ते कसारा दरम्यान चौथ्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे. या मार्गिकांचे काम 3 ते 4 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पनवेल-वसई दरम्यान स्वतंत्र लोकल मार्गिकेचे काम करण्यात येणार असून त्यासाठी 5 ते 6 वर्षे लागण्याचा अंदाज आहे. सर्व मार्गिकांवर साधारण 14 हजार कोटींचा खर्च येणार असून पेंद्र व राज्य सरकार 50-50 टक्के खर्चाचा भार उचलणार आहे.