
शहरातील तलाव आणि खाडीच्या पात्रात आत्महत्या तसेच मान्सून कालावधीत तोल जाऊन पडणे व अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या घटना रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून ठाण्यातील तलाव, खाड्यांवर 15 स्विमर्स 24 तास वॉच ठेवणार आहेत. ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ताफ्यात नव्याने स्विमर्सची भरती करण्यात येणार असून महापालिका आता बुडणाऱ्यांना वाचवणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मान्सून कालावधीत ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे खाडीत बुडणे, अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा वेळी 24 तास तीन सत्रात खाडी व तलावात स्विमर्स तातडीने उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. व्यवस्थापन कक्षाकडे अतिवृष्टीमुळे नाला, खाडी, नदी, समुद्र या पाण्याच्या प्रवाहात माणसे वाहून जाणे, बुडणे अशा प्रसंगी त्यांच्या जीविताचे रक्षण करण्याचे काम स्विमर्सच करणार आहेत. भरती करण्यात येणाऱ्या स्विमर्सची 15 हजारांच्या मासिक मानधनावर कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे.
तलाव, खाडी बनले आत्महत्येचे स्पॉट
कळवा खाडी, वाघबीळ, कोलशेत, रेतीबंदर, साकेत, खारेगाव, गायमुख आणि रेल्वेच्या ब्रीजजवळ जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत तब्बल 10 जणांचे मृत्यू झाले आहेत. या घटनेत नऊ पुरुष तर एका महिलेचा समावेश असून ठाण्याचे तलाव आणि खाडी आत्महत्येचे स्पॉट
बनले आहेत.
अटी-शर्ती काय आहेत?
■ नदी, खाडी, ओढा, समुद्र या वाहत्या पाण्याच्या स्रोतामध्ये पोहण्याचा कमीत कमी दोन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
■ उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे. त्याबदल त्याने एमबीबीएस डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
■ उमेदवाराने वयाची 18 वर्षे पूर्ण व 33 वर्षे वयाच्या आतील असणे आवश्यक आहे.
■ उमेदवारांची तरणतलाव, आपत्ती विभागामार्फत नियुक्त केलेल्या निवड समितीमार्फत प्रात्यक्षिक निवड चाचणी घेण्यात येणार आहे.