हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दुहेरी धमाका केला. अखेरच्या 11व्या फेरीत हिंदुस्थानी पुरुष संघाने स्लोवेनियाचा 3.5-0.5 असा पराभव करीत 21 गुणांसह अव्वल स्थान राखले. याचबरोबर हिंदुस्थानच्या महिला संघाने अझरबैजानचा 3.5-0.5 असा पराभव करीत सर्वाधिक 19 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
महिला संघाला अखेरच्या फेरीत सुवर्ण
हिंदुस्थानच्या पुरुष संघाने दहाव्या फेरीनंतरच आपले सुवर्णपदक पक्के केले होते, मात्र महिला संघाच्या सुवर्णपदकावर 11व्या फेरीनंतर शिक्कामोर्तब झाले. कझाकिस्तानला अमेरिकेने 2-2 असे बरोबरीत रोखल्यामुळे हिंदुस्थानी महिलांचा 19 गुणांसह सुवर्णपदकाचा मार्ग मोकळा झाला. कझाकिस्तानला 18 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दहाव्या फेरीनंतर हिंदुस्थान व कझाकिस्तान 17-17 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर होते, मात्र 11 व्या फेरीत हिंदुस्थानी महिलांनी अझरबैजानचा 3.5-0.5 असा पराभव केला. हरिका द्रोणावली, दिव्या देशमुख व वंतिका अग्रवाल यांनी आपापल्या लढती जिंकल्या, तर वैशाली रमेशबाबू हिला ड्रॉवर समाधान मानावे लागले. हिंदुस्थानी महिलांनी 11 पैकी पहिल्या 7 फेऱ्या जिंकल्या. आठव्या फेरीत पोलंडकडून हार पत्करावी लागली. नवव्या फेरीत अमेरिकेशी बरोबरी झाली. दहाव्या फेरीत चीन आणि अकराव्या फेरीत अझरबैजानचा पराभव करीत हिंदुस्थानी महिलांनी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदकाला गवसणी घातली.
खुल्या गटात हिंदुस्थान अजिंक्य
खुल्या गटात हिंदुस्थानी संघाने दहाव्या फेरीनंतरच सुवर्णपदक पक्के केले होते. स्पर्धेत सलग आठ फेऱ्या जिंकल्यानंतर हिंदुस्थानने उझबेकिस्तानशी बरोबरी साधली होती. त्यानंतर दहाव्या फेरीत चीन, तर अकराव्या फेरीत अझरबैजानचा पराभव करीत हिंदुस्थानी संघाने सुवर्णपदक जिंकले. अखेरच्या फेरीत डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद व अर्जुन इरिगॅसी यांनी आपापल्या लढती जिंकल्या, तर विदित गुजरातीला बरोबरीवर समाधान मानावे लागले. स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या हिंदुस्थानी सर्वाधिक सर्वाधिक 21 गुणांची कमाई केली. चीन व अमेरिका हे संघ 16-16 गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर राहिले. याआधी 2022 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये हिंदुस्थानने मायदेशात कांस्यपदक जिंकले, तर 2014 मध्येही कांस्यपदकच जिंकले होते.