नेरळमध्ये हाय व्होल्टेज ड्रामाने टीव्ही, फ्रीज, गिझर उडाले

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला की अनेकदा बत्ती गुल होते. मात्र नेरळमध्ये अनेक दिवसांपासून ट्रान्सफार्मरमध्ये स्पार्क होत असल्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. कधी डीम लाईट तर कधी अधिक पॉवरने वीजपुरवठा होतो. त्यामुळे नेरळ परिसरातील अनेकांच्या घरांमधील टीव्ही, फ्रीज तसेच अन्य इलेक्ट्रीक वस्तूंमध्ये बिघाड होत आहे. या ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ने नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.

राजेंद्रगुरूनगर येथील ट्रान्सफार्मरमध्ये २२ सप्टेंबर रोजी स्पार्क होऊन आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून होणाऱ्या स्पार्कमुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली आहे. कुंभारआळी ते राजेंद्रगुरूनगर मार्गावरील कवाडकर यांच्या घराजवळील विद्युत पोल गंजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे तो कधीही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्याचा बळी गेल्यावर महावितरणला जाग येईल का? असा संतप्त सवाल नेरळवासीयांनी विचारला आहे.

ट्रान्सफार्मर मध्ये वारंवार होणाऱ्या स्पार्कवर कायमचा तोडगा काढण्यासाठी नेरळ महावितरण कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र बघतो, सांगतो असे म्हणत अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.