सिडको दसऱ्याला 40 हजार घरांचे तोरण बांधणार

गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर 900 घरांची हंडी फोडणाऱ्या सिडकोने आता दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे 40 हजार घरांचे तोरण बांधण्याची तयारी सुरू केली आहे. ही सर्व घरे प्रधानमंत्री आवास योजनेतील असून ती सर्व आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी बांधण्यात आली आहे. या घरांचा निवासी वापर सुरू झाल्यानंतर त्याचा शहराच्या परिवहन सेवेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी सर्वच गृहनिर्माण प्रकल्पांची निर्मिती रेल्वे स्थानकांच्या जवळ करण्यात आली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या योजनेबाबत घोषणा केल्यानंतर नवी मुंबईत घरांच्या शोधात असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईत हक्काचा निवारा मिळावा यासाठी सिडकोने एक लाख घरांच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यापैकी 67 हजार घरांची निर्मिती प्रगतीपथावर असून सुमारे 40 हजार घरांचे बांधकाम येत्या काही महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे सिडकोचा या घरांच्या विक्रीसाठी मोठी गृहनिर्माण योजना आणण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर या योजनेची अधिकृत घोषणा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केली आहे. ही सर्व घरे जुईनगर, खारघर, खांदेश्वर, खारकोपर या रेल्वे स्थानकांच्या परिसरात आहेत. रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर नागरिकांना पाच मिनिटांत चालत घरात पोहोचता येणार आहे. त्यामुळे या नागरीकरणाचा कोणताही परिणाम शहराच्या सार्वजनिक आणि खासगी परिवहन सेवेवर होणार नाही. सिडकोने यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बामणडोंगरी रेल्वे स्थानक परिसरात बांधलेल्या घरांची लॉटरी काढली आहे. या लॉटरीत सुमारे पाच हजार घरे असून त्यांचा ताबा विजेत्यांना देण्याची प्रक्रिया येत्या एक ते दोन महिन्यांत सुरू होणार आहे. त्यापाठोपाठ आता 40 हजार घरांची योजना जाहीर होणार असल्याने नवी मुंबईच्या रियल इस्टेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मजला निवड करण्याचा पर्याय देणार

सिडको रेल्वे स्थानक परिसरात बांधत असलेल्या 40 हजार घरांचे बांधकाम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांची लॉटरी दसऱ्यापर्यंत जाहीर करण्याचे नियोजन सिडकोने तयार केले आहे. या लॉटरीमध्ये अर्जदारांना प्रकल्पाची आणि मजल्याची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये हा पर्याय उपलब्ध नव्हता. घरांच्या किमती खासगी व्यावसायिकांच्या तुलनेत कमी ठेवण्यात येणार आहेत, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केली आहे.