भात पिकावर बगळ्या, नागलीवर करप्याचा हल्ला; मोखाड्यातील शेतकरी हवालदिल

एकीकडे परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली असतानाच मोखाड्यात भात पिकावर बगळ्या आणि नागली पिकावर करप्या किडीने हल्ला केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिके परिपक्व होत असतानाच भात पिकावर बगळ्या तर नागलीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उभी पिके करपून गेली आहेत. हातातोंडाशी आलेले पीक हातून जाणार असल्याने अस्मानी संकट कोसळले आहे.

यंदा खरीप हंगामास उपयुक्त पाऊस बरसल्याने पेरणी आणि लावणीची कामे वेळेत झाली. तालुक्यात खरिपाचे 12 हजार 759 हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये नागली 4 हजार 322, वरई 3 हजार 775 आणि भाताचे 2 हजार हेक्टर क्षेत्र आहे. तृणधान्य पिकाचे 10 हजार 223 हेक्टर क्षेत्र आहे. उडीद, कुळीद, तूर या कडधान्याचे 1 हजार 788 हेक्टर क्षेत्र आहे. तर भुईमूग, सूर्यफुल, खुरासणी आणि तीळ या गळीत धान्याचे 747 हेक्टर क्षेत्र आहे. गणेशोत्सवानंतर भाताची लोंबी (गोंडा) बाहेर येत आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला होता. मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही. गोंडा बाहेर टाकलेल्या भात पिकांवर बगळ्या तर नागलीवर करप्या रोगाने घाला घातला आहे. त्यामुळे उभी पिके करपून आडवी झाली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे.

कृषी विभागाकडे औषधेच नाहीत

किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे पिकांवर फवारणी करण्यासाठी कीटकनाशक उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने औषधांचा साठा उपलब्ध करून दिला नसल्याचे सांगून कृषी विभागाने हात वर केले. याचा फटका पिकांना बसलाय आहे. यामुळे शेतकरी मिंधे सरकारविरोधात संतप्त झाले आहेत.