पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आता दुचाकीस्वारांसह सहप्रवाशालाही हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय राज्याच्या वाहतूक विभागने घेतला आहे. याबाबतचे आदेश राज्याचे अपर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी दिले आहेत. दरम्यान, वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांचा होणारा मृत्यू आणि गंभीर दुखापत याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या प्रवाशाने हेल्मेट वापरले नाही तर त्यांच्याविरुद्ध ई-चालान मशीनमध्ये स्वतंत्र हेडखाली कारवाई केली जाणार आहे. पंरतु या आदेशाची कधीपासून अंमलबजावणी होणार याबाबत निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.
शहरासह ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर दुचाकीस्वार विनाहेल्मेट प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यासोबतच अपघतांमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला होता. राज्यात मागील 5 वर्षांतील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवाशांचे अपघात, मृत्युमुखी व जखमींच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. त्यासोबतच वाहतूक पोलिसांकडून मोटार वाहन कायदा 1988च्या तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट चालकांसह सहप्रवाशांविरुद्ध प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवर कारवाईचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
हेल्मेटसक्ती अन् पुणेकरांचा विरोध
राज्यासह अनेक महत्त्वाच्या शहरात हेल्मेटसक्तीला वारंवार विरोध केल्याचे दिसून आले आहे. मात्र आता दुचाकीस्वारांचे वाढते अपघात लक्षात घेउन संबंधितांनी हेल्मेट परिधान करण्यासाठी प्राधान्य द्यावे, यासाठी पोलीस प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आदेशाची अंमलबजावणी पुण्यातही केली जाण्याची शक्यता आहे. सध्या वाहतूक पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारावर कारवाई करत आहेत. दरम्यान, अपर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार विनाहेल्मेट दुचाकीस्वार, सहप्रवाशी कारवाईच्या जाळ्यात अडकणार आहेत. त्यामुळे याला पुणेकरांचा विरोधही होऊ शकतो, अशी शक्यता आहे.
पुण्यात वाहतूक पोलीस दक्ष, मशीनमध्ये बदलही केले
विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांनी हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे अन्यथा आदेशानुसार बेशिस्त दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पुणे वाहतूक पोलीस दक्ष झाले असून त्यांनी ई-चालान मशीनमध्ये हेडनुसार बदल केला आहे. लवकरच हेल्मेटबाबत कारवाईची अंमलबजावणी केली जाणार आहे. वाहतूक केसेससाठी वापरण्यात येणाऱया ई-चालान मशीनमध्ये विनाहेल्मेट दुचाकीस्वार व विनाहेल्मेट पिलियन रायडर दोन्ही केसेसची वेगवेगळ्या हेडखाली प्रभावीपणे कारवाई होणार आहे.