कोल्हापुरात ‘जनतादरबारा’त तक्रारींचे 345 अर्ज दाखल; नागरिकांच्या तक्रारी सोडवा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन व ‘जनतादरबार’ जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर जिल्हा कार्यालयांबाबत तक्रारींचे सर्वसाधारण 345 अर्ज प्राप्त झाले आहेत. नागरिकांच्या या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

करवीर तहसीलदार 27, जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत 104, जिल्हा परिषद 40, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख मोजणी 21, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था 18, जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग 43, जिल्हा पोलीस अधीक्षक 20, जिल्हा प्रबंधक अग्रणी बँक 7, राज्य महावितरण 12, लाचलुचपत विभाग 1 आदी कार्यालयांसंदर्भात तक्रारी आहेत.

विधानसभा कामकाजामुळे या जनतादरबारावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.