अंध दाम्पत्याला झालेले बाळ डॉक्टरने परस्पर दत्तक दिले

अंध दाम्पत्याला झालेले बाळ डॉक्टरने परस्पर दत्तक दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अनुदुर्ग धोनी असे डॉक्टरचे नाव असून त्याने कोणत्याही कायदेशीर बाबी व प्रक्रिया पूर्ण न करता हे बाळ आपल्या परिचयातील एका व्यक्तीला दिल्याचा आरोप अंध दाम्पत्याने केला. अखेर अंध दाम्पत्याने सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर डॉक्टरने तब्बल आठ दिवसांनी त्यांचे बाळ पुन्हा त्यांच्या स्वाधीन केले.

रोहित गुरव व केराबाई गुरव असे अंध दाम्पत्याचे नाव असून ते मोहाने गोळेगाव परिसरात राहतात. त्यांना तीन वर्षांची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. रेल्वेच्या डब्यात भीक मागून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दोन मुले असतानाही केराबाई पुन्हा गर्भवती राहिल्या. आपल्याला तिसरे बाळ नको म्हणून गर्भपात करण्यासाठी ते दाम्पत्य मोहण्यातील गणपती नर्सिंग होममध्ये पोहोचले. बाळ तीन महिने 14 दिवसांचे झाल्याने डॉक्टरने गर्भपात न करता ते बाळ वाढवण्याचा सल्ला दिला. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला चांगल्या घरात दत्तक देऊ असे सांगितले. तसेच तुमच्या प्रसूतीचा खर्च व दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी मुलाच्या भविष्याचा विचार करून अंध दाम्पत्याने होकार दिला. मात्र बाळ दत्तक दिल्यानंतर डॉक्टरांनी दोन मुलांच्या शिक्षणासाठी खर्च देणार नसल्याचे सांगताच या अंध दाम्पत्याने सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने डॉक्टरला धारेवर धरले. अखेर डॉक्टरने आठ दिवसांनंतर दत्तक दिलेले बाळ रोहित गुरव यांच्या स्वाधीन केले.