गडहिंग्लज तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, हातात आलेल्या पिकांवर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, भातपीक आडवे झाले आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने शेतकऱ्यांना वाली कोण, असा प्रश्न पडला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण टाकले आहे.
यावर्षी मान्सून समाधानकारक बरसल्याने खरीप पिके जोमाने आली आहेत. सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांना पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. मात्र, परतीचा पाऊस वेळेत परतेल, अशी शक्यता असताना त्यात अवकाळी पावसाची भर पडल्याने हाता-तोंडाशी आलेली पिके पाण्यात थांबली आहेत. दररोज अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असल्याने तालुक्यातील भातपीक आडवे झाले आहे. कापणीला आलेले पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. काढणीला आलेल्या भुईमूग पिकालादेखील याचा फटका बसला असून, जमिनीत शेंगांना कोंब फुटले आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गडहिंग्लज तालुक्यात यंदा जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली आहे.