भोकरमध्ये अशोक चव्हाणांच्या मुलीसमोर मराठा आरक्षणप्रकरणी घोषणाबाजी; आंदोलकांकडून रोष व्यक्त

भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण शुक्रवारी भोकर तालुक्यातील कामनगाव या गावी गेल्या असता त्यांच्यासमोरच मराठा आरक्षणप्रश्नी मराठा समाज बांधवांनी ‘एक मराठा लाख मराठा’ ची जोरदार घोषणाबाजी केली. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना शुक्रवारी मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचा मराठवाड्यात दौरा संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातही शांतता रॅलीचा दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यातील भोकर विधानसभा क्षेत्रात भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भोकर तालुक्यातील कामनगाव या ठिकाणी त्या गेल्या होत्या. त्यावेळी गावातील मराठा समाज बांधवांनी त्यांच्यापुढे ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. श्रीजया चव्हाण यांना ग्रामपंचायतीत जाऊ नका असे सांगत, मराठा आंदोलन आक्रमक झाले होते. यावेळी मराठा समाजातील तरुणही आक्रमक झाले होते. माझे शिक्षण होऊन घरी बसलोय, आरक्षण नसल्यामुळे माझ्याकडे फी भरायला पैसे नाहीत, आम्ही काय करायचे, असा संतप्त सवाल मराठा समाजातील तरुणांनी श्रीजया चव्हाण यांना केला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेले खासदार अशोक चव्हाण यांनाही भोकरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या आरक्षणप्रश्नी रोषाला सामोरे जावे लागले आहे. यानंतर भोकर विधानसभेतून इच्छुक असलेल्या त्यांची मुलगी श्रीजया यांनाही मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.