उशीने तोंड दाबून मातेने चिमुकलीला संपवले; स्वतःही केली आत्महत्या

उशीने तोंड दाबून मातेनेच पोटचा गोळा असलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीला संपवून स्वतः ही गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पूजा सकपाळ (29) असे आत्महत्या करणाऱ्या निर्दयी मातेचे नाव असून समृद्धी असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. या निर्दयी मातेने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेने डोंबिवलीकर सुन्न झाले आहेत.

डोंबिवली-कल्याण शीळ रोडवरील रुणवाल या हाय प्रोफाईल सोसायटीत राहुल सकपाळ (35) हे आपली पत्नी पूजा व मुलगी समृद्धी यांच्या सोबत राहात होते. राहुल हे आयटी इंजीनियर असून त्यांचे पूजासोबत चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. रविवारी रात्री राहुल कामावरून घरी परतले त्यावेळी पूजा यांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तसेच मुलगी समृद्धी हिची उशीने तोंड दाबून हत्या केल्याचे लक्षात येताच भेदरलेल्या राहुल यांनी घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

रहिवाशांची मने हेलावली

गोंडस समृद्धी आपल्या आईसोबत फिरायला जायची तेव्हा रुणवाल सोसायटीमधील रहिवासी तिला हाक मारायचे. समृद्धीही गालातल्या गालात गोड हसायची. मात्र अचानक तिची हत्या आईने केल्याचे समजताच शेजारच्यांची मने हेलावून गेली. एवढे टोकाचे पाऊल आई कसे काय घेऊ शकते. याच विचाराने रहिवासी चक्रावून गेले आहेत.

लवकरच उलगडा होणार

पूजा सकपाळ या मातेने चिमुकलीची हत्या करून आत्महत्या केल्याच्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पूजा हिने ही आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने या प्रकरण उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूजा हिने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, पूजाने पोटच्या चिमुकलीची हत्या का केली, तिच्यावर कोणाचा दबाव होता का, तिला कोणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे का, अशा विविध प्रश्नांचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एक पथक नेमले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.