
राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या आदेशानुसार विधानसभेत परिपत्रक काढून प्राथमिक शाळा, प्रि प्रायमरी स्कूल सकाळी 7.30 वाजेऐवजी 9 वाजता भरवाव्या, या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, अशी मागणी युवासेना प्रदेश सहसचिव विक्रम राठोड यांनी केली आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
निवदेनात त्यांनी म्हटले आहे की, नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करून लहान वयातील मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे सुचवण्यात आले आहे. त्यात सकाळी 7.30 ऐवजी सकाळी 9 वाजता ही वेळ शाळा सुरू करण्यासाठी ठरवण्यात आली आहे. नगर शहरातील काही प्री प्रायमरी स्कूल ही वेळ पाळतात पण शहरातील बऱ्याच शाळा या सरकारी नियमाला केराची टोपली दाखवतात. विद्यार्थ्यांचे पालक यांनी याबाबत तक्रार केली की पालक आणि विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो.आपल्या हेकेखोर वृत्तीने संस्थाचालक आणि स्कूलचे प्राचार्य इतर स्टाफ मनमानी पद्धतीने सकाळी 7.30 वाजता वर्ग भरवतात, हे चुकीचे आहे. शिक्षक आणि संस्थाचालक आपल्या वेळेचा विचार करून हे राबवत आहेत. वास्तविक सकाळी शाळेची तयारी करताना मुलांना पहाटे पाच साडेपाचलाच उठावे लागते तर वेळेत ते पोहोचतात.
मुले उशीरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी सकाळी 9 वाजता शाळा भरवणे आवश्यक आहे. शिक्षक आपल्या सोयीनुसार सकाळी शाळा भरवतात. त्यामुळे त्यांना दिवस मोकळा मिळतो. त्यामुळे काही शाळा वेळापत्रक बदलयाला तयार नाहीत. नव्या नियमाप्रमाणे शाळा 9 वाजता सुरू करावी, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.